- ११ जणांना अटक : रोख रक्कम व मुद्देमाल जप्त
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर व परिसरात अवैध जुगार, मद्यविक्री आणि अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात पोलिसांनी एकाच दिवशी व्यापक कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेतले आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यांमध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन तसेच अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागनगौडा कट्टमणीगौडा यांच्या नेतृत्वाखाली येळ्ळूर–अनगोळ रस्त्यावरील मोकळ्या जागेत ‘अंदर-बाहर’ जुगार खेळणाऱ्या ८ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत ९,९८० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने बहाद्दरवाडी क्रॉसजवळील एका बारच्या शेजारी अवैध दारू विक्री करणाऱ्या परमेश्वर देवाप्पा नाईक याला अटक केली. त्याच्याकडून गोवा बनावटीच्या मद्यासह ५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एपीएमसी पोलिसांनी रामनगर परिसरात छापा टाकून अशोक राम ईचल याला अटक करत देशी व विदेशी दारूचे टेट्रा पॅक हस्तगत केले.
खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनगोळ रस्त्यावर संशयास्पद वर्तन करणाऱ्या मयूर सुभाष राऊत याला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, माळमारुती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल मुळगुंद यांच्या नेतृत्वाखाली उज्वलनगर येथील रेल्वे ट्रॅकजवळ सार्वजनिक ठिकाणी मटका घेत असलेल्या फारुख बादशहा बनारसी (वय ३४) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
या सर्व यशस्वी कारवायांबद्दल शहर पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून, शहरात अवैध धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.








