बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यात पोलिसांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवाईत अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणाला तसेच मटका अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

हिरेबागवाडी पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या सोमनाथ रमेश कल्लन्नवर (२४, रा. रामापूर गल्ली, तारीहाळ) याला ताब्यात घेतले. २३ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नवर आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना अडविसिद्धेश्वर मठाजवळ तो संशयास्पद हालचाली करताना दिसला. चौकशीत त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्याची वैद्यकीय तपासणी करून हिरेबागवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मच्छे गावातील अशोक आयर्न प्लांट-३ समोर मटका अड्ड्यावर छापा टाकून बनप्पा बाळप्पा कोनकेरी (वय ३१) आणि प्रकाश लगमप्पा तल्लुरी (वय २८, दोघेही रा. मार्कंडेय नगर, बेळगाव) यांना अटक केली. २३ सप्टेंबर रोजी पीएसआय लक्ष्मण जोडट्टी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दोघांकडून २,७०० रुपयांची रोख रक्कम आणि मटका साहित्य जप्त केले. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.