- जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जि. पं. सीईओ राहुल शिंदे
बेळगाव : जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना थेट उद्योगविश्वाशी जोडण्याच्या उद्देशाने ७ मार्च रोजी बेळगावात जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात हा मेळावा पार पडणार असून, तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मेळाव्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ राहतील, तर वैद्यकीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव, हुबळी आणि बंगळुरू येथील १०० हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असल्याने विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एसएसएलसी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर किंवा इतर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








