• माळमारुती पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

सीमावर्ती जिल्हा असलेल्या बेळगावात पोलिसांनी मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. गोव्याहून महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी नेली जात असलेली तब्बल ४० लाख रुपये किमतीची अवैध दारू माळमारुती पोलिसांनी थरारक पाठलागानंतर जप्त केली.

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटप करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. KA-27-C-5419 क्रमांकाचा कँटर अडवून झडती घेतली असता, सुरुवातीला वाहनात जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या व काचेच्या भंगाराने भरलेल्या गोण्या दिसून आल्या.

मात्र संशय बळावल्याने पोलिसांनी सखोल तपासणी केली असता, त्या गोण्यांच्या खाली अत्यंत चतुराईने लपवलेला दारूच्या बॉक्सचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत ८०० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले असून, वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

डीसीपी बरमनी, एसीपी संतोष सत्यनायक आणि सीपीआय बी. आर. गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चालकाच्या चौकशीत ही दारू महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी नेली जात असल्याचे उघड झाले आहे. या तस्करीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.