• विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी
  • बाजारपेठेत धांदल ; गारपिटीने चिंता वाढली
  • शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वळीव पावसाने जोरदार हजेरी लावत वातावरणात लक्षणीय बदल घडवून आणला आहे. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शहरात सुखद गारवा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी गारपीठ झाली असून पावसाचा जोर अनेक भागांत जाणवला.

दरम्यान, गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी असतानाच दुपारच्या सुमारास अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसासोबत पडलेल्या गारांमुळे रस्त्यांवर पांढऱ्या थरांचे दृश्य पाहायला मिळाले. या अनोख्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी लहान मुलांनी मोठ्या उत्साहात गारा वेचत गर्दी केली.

या वळीव पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला चालना मिळणार असल्याने शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे. जमिनीच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, गारपिटीमुळे आंबा आणि इतर फळबागांचे संभाव्य नुकसान लक्षात घेता बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सकाळी उन्हाळी कडक वातावरणानंतर दुपारी अचानक बदललेल्या हवामानामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले असले तरी एकूणच बेळगावकरांनी या पावसाचे स्वागतच केले आहे.