- पहिल्याच दिवशी बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावकरांच्या धार्मिक परंपरेचे प्रतीक ठरलेली श्री दुर्गामाता दौड नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उत्साहात सुरू झाली. देव, देश आणि धर्माविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित या दौडीला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नवरात्रीच्या शैलपुत्री देवी पूजनाने या वर्षीच्या दौडीचा शुभारंभ झाला. प्रारंभी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्गावरील उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे छत्रे गुरुजी व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रेरणामंत्रासह ध्वजारोहण करण्यात आले आणि दौडीला सुरुवात झाली.

दौड पुढे हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एस.पी.एम. रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्री नगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड क्रॉस नं.४, माणिकबाग रोड, समर्थ नगर, तानाजी गल्ली, महाद्वार रोड क्रॉस नं. ३ आणि २ मार्गे छत्रपती संभाजी गल्लीपर्यंत निघून पुन्हा एस.पी.एम. रोडवर परतली.
युवतींनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने दौडमध्ये सहभाग नोंदवला. गल्ल्यांमध्ये नागरिकांनी औक्षण करून भक्तीभावाने दौडीचे स्वागत केले. मार्गभर आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका आणि तोरणांनी सजावट केली होती. दौडीत श्री दुर्गा, भवानी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी दौडीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे म्हणाले, “या वर्षी दौडीचे २७ वे वर्ष आहे. दरवर्षी सहभागी धारकऱ्यांची संख्या वाढत आहे. जगभरात सुख-समृद्धी नांदावी व देव-देश-धर्म अखंड राहावा, हा या दौडीमागचा मुख्य हेतू आहे.”
दौडीचा समारोप दक्षिण काशी कपिलेश्वर येथे महाआरतीने झाला. एसीपी कट्टिमनी, एसीपी शेखरप्पा यांच्यासह मान्यवरांनी ध्वज उतरवला आणि पहिल्या दिवसाच्या दौडीची सांगता केली. मंगळवारी ही दौड राणी चन्नम्मा सर्कलपासून सुरू होऊन किल्ले दुर्गादेवी मंदिरात संपन्न होणार आहे.
