- दारू तस्करी, मटका, वाहनचोरी व अंमली पदार्थ सेवन प्रकरणी ७ जण अटकेत
- १७.८ लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी समन्वयाने आणि वेगाने मोहीम राबवत दारू तस्करी, मटका -जुगार, अंमली पदार्थ सेवन तसेच वाहनचोरी प्रकरणांमध्ये गुंतलेल्या सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

शनिवारी उद्यमबाग, मारिहाळ, हिरेबागेवाडी आणि टिळकवाडी या पोलीस स्थानकांच्या हद्दीत व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. उद्योगबाग परिसरात गोव्याहून अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये किमतीची किआ कार जप्त करण्यात आली आहे.
मारिहाळ परिसरात मटका – जुगार चालवणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. याचवेळी सीसीबी पोलिसांनी २० हून अधिक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या कुख्यात आरोपी संजू मेखलाला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २.७८ लाख रुपये किमतीची चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने हिरेबागेवाडी आणि टिळकवाडी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून अश्लील वर्तन करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

या संयुक्त कारवाईत एकूण सहा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सात आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे १७.८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी या यशस्वी मोहिमेबद्दल संबंधित पथकांचे कौतुक केले असून, शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अशी कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.








