• विशेष मोहिमेत शेकडो वाहनांवर दंडात्मक कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, नंबर प्लेट नसलेल्या अथवा नियमबाह्य नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, शहरभर राबवलेल्या विशेष तपासणीत १२६ दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान एकाच दिवशी तब्बल ६३ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.

पोलिसांनी केवळ दंड आकारण्यावर न थांबता, नियमभंग करणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेट तात्काळ दुरुस्त करून घेत संबंधितांना कडक इशारा दिला. वाहनधारकांनी विहित नमुन्याच्या नंबर प्लेट लावून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आगामी काळातही अशा प्रकारची विशेष मोहीम सातत्याने राबवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.