बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेच्या जन्म व मृत्यू दाखला विभागात होत असलेल्या गर्दीची दखल घेत महापौर मंगेश पवार यांनी उपमहापौर वाणी जोशी तसेच नगरसेवकांसह विभागाला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून जन्म-मृत्यू दाखला विभागात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून, अपुऱ्या जागेमुळे लोकांना रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात येताच महापौरांनी अचानक भेट देत कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
कार्यालयातील मर्यादित जागा, काउंटरची अपुरी संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारा नागरिकांचा मनस्ताप पाहून महापौर मंगेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केवळ पाहणीपुरते न थांबता, गर्दी कमी करण्यासाठी जन्म-मृत्यू दाखला विभाग तातडीने विस्तारित करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
चर्चेनुसार या विभागात अतिरिक्त काउंटर सुरू करण्यात येणार असून नागरिकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था केली जाणार आहे. तसेच दाखले मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद व सुलभ करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या बदलांमुळे नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागणार नाही, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.








