- पर्यावरणपूरक घरांसाठी मालमत्ता करात सवलत जाहीर
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिका च्या सभागृहात बुधवारी झालेल्या विशेष बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४४२.५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमहापौर वाणी जोशी, आयुक्त कार्तिक एम. तसेच पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

कर आकारणी व वित्त स्थायी समितीच्या अध्यक्षा रेखा हुगार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात ४४१.६२ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून ९२.३२ लाख रुपयांची अंतिम बचत दर्शविण्यात आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सार्वजनिक कल्याणाला प्राधान्य देणारा हा बचत अर्थसंकल्प असल्याचा दावा करण्यात आला.

स्वच्छ शहराचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाचा विकास, महिला सक्षमीकरण, तसेच वैज्ञानिक पद्धतीने घनकचरा विल्हेवाट प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नागरी कामगार व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना आणि दैनंदिन नाश्त्याची सुविधा जाहीर करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिकांना दिली जाणारी १० टक्के मालमत्ता कर सवलत यावर्षीही कायम ठेवण्यात आली आहे.

सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाळी यांनी ८५ टक्के कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती दिली. विरोधी पक्ष सदस्य रवी साळुंके यांनी थकीत कर उद्योग व व्यावसायिकांकडून प्रत्यक्ष जाऊन वसूल करण्याची सूचना केली. रियाज किल्लेदार यांनी थकीत कर भरल्याशिवाय विकास शक्य नसल्याचे नमूद केले, तर अझीम पटवेगार यांनी अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली.

एकंदरीत बचतीसह सादर झालेल्या या अर्थसंकल्पातून महापालिकेने विकास आणि आर्थिक शिस्तीचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.








