• सडलेली अंडी दिल्याचा आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज कष्ट करणाऱ्या बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चव्हाट गल्ली परिसरात कार्यरत कर्मचाऱ्यांना दिलेल्या जेवणात सडलेली व पिवळी पडलेली अंडी देण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला असून या घटनेमुळे महापालिकेच्या अन्न पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरातील चव्हाट गल्ली परिसरात काम करणाऱ्या महापालिकेच्या सुमारे ६९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना रोजच्या जेवणासोबत अंडी पुरवली जातात. मात्र अलीकडे देण्यात आलेली अंडी उकडल्यावर त्यांचा रंग पिवळसर पडल्याचे आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. निकृष्ट दर्जाचे अन्न पाहून अनेक कामगारांनी ते खाण्यास नकार दिला. काही कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, दिलेली अंडी इतकी खराब होती की जनावरेदेखील ती खाणार नाहीत.

दिवसभर शहराची स्वच्छता राखण्यासाठी मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यदायी व पौष्टिक अन्न देणे ही महापालिकेची जबाबदारी असताना त्यांना अशा प्रकारचे अन्न देणे ही गंभीर बाब असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. अशा निकृष्ट अन्नामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित कंत्राटदाराला विचारणा करण्यात आली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अंडी जास्त वेळ उकळल्यामुळे त्यांचा रंग बदलला असावा, असा दावा त्याने केला. मात्र कामगारांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत निकृष्ट अन्न पुरवठ्याबाबत जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकारामुळे बेळगाव महापालिकेच्या देखरेख व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न पुरवठ्याची गुणवत्ता तपासण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य देखरेख होत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुढे दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवले जावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.