बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी तातडीची व सुलभ सेवा मिळावी या उद्देशाने बेळगाव महानगरपालिकेतर्फे दोन नव्या अत्याधुनिक शववाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. या वाहनांचे लोकार्पण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील तसेच आयुक्त कार्तिक एम. यांच्या हस्ते वाहनांना हिरवा झेंडा दाखवून जनतेच्या सेवेसाठी अर्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या वतीने दोन अत्याधुनिक मुक्ती वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून भविष्यात आणखी दोन वाहने खरेदी करण्याचा विचार आहे. तसेच वाहनांची नियमित देखभाल व नोंदवही व्यवस्थित ठेवावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
आमदार अभय पाटील यांनीही प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट करत पूर्वी वाहनांच्या बिघाडाच्या घटना घडल्याची आठवण करून दिली. अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच दक्षिण मतदारसंघासाठी आमदार निधीतून आणखी एक वाहन देण्याची घोषणाही त्यांनी केली. या लोकार्पण कार्यक्रमास स्थायी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








