- आता मद्यपी चालकांवरही दाखल होणार गुन्हा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात गांजा विक्री आणि सेवनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना ‘ड्रग डिटेक्शन किट्स’ देण्यात आले असून, यापुढे गांजा ओढणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली आहे.
शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना के. रामराजन यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात गांजाचे प्रमाण वाढत असल्याने कठोर पावले उचलली जात आहेत. जिल्ह्यातील ३४ पोलीस ठाण्यांना प्रत्येकी ४० ते ५० याप्रमाणे एकूण १,५५० ‘गांजा चाचणी किट्स’ वितरित करण्यात आले आहेत. चिकोडी, रायबाग आणि खानापूर तालुक्यात या कारवाई अंतर्गत एका महिलेसह दहा विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.
गोवा आणि महाराष्ट्र सीमेवरून होणारी गांजाची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. गांजा विक्रेत्यांना शिक्षा होण्यासाठी पुरावा म्हणून सेवन करणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवले जात आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा अवैध कृत्य केल्यास संबंधितांना थेट तडीपार करण्यात येईल, असा इशारा के. रामराजन यांनी दिला.
रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. मद्यपान करून वाहन चालवताना अपघात झाल्यास चालकावर थेट खुनाचा (भारतीय न्याय संहितेनुसार) गुन्हा दाखल केला जाईल. तसेच हायवेवरील ढाबे, हॉटेल किंवा ग्रामीण भागातील दुकानांमध्ये अवैध मद्यविक्री आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांचे व्यापार परवाने रद्द केले जातील.
जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने, हॉटेल आणि ढाब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या ग्राहकांची माहिती मालकांनी पोलिसांना देणे बंधनकारक आहे. जर मद्यपी चालकामुळे अपघात झाला, तर संबंधित मद्यविक्री दुकानाच्या मालकालाही जबाबदार धरून गुन्हा दाखल केला जाईल, असे के. रामराजन यांनी सांगितले.







