- ऑरेंज अलर्ट जारी
बेळगाव : उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कर्नाटकात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून, बेळगावसह राज्यातील सात जिल्ह्यांत तीव्र थंडीची लाट जाणवू लागली आहे. तापमानात झालेल्या अचानक घसरणीमुळे हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. सध्या कर्नाटकातील २२ जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे थंडीचा प्रकोप अधिक तीव्र झाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारपासून पुढील दोन दिवस बेळगाव, गुलबर्गा, बागलकोटसह एकूण सात जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमानात ६ ते ७ अंशांची घट नोंदवली गेली आहे.
थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी थंड हवामानापासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.








