- बाप्पाला बघण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी
- सीमाभागातील पहिला गणपती आगमन सोहळा उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही डोळे दीपतील असे बेळगावच्या राजाचे सुंदर रूप पाहायला मिळाले. मूर्तिकार रवी लोहार यांनी बेळगावच्या राजाची प्रभावळीसह २१ फूट उंच मूर्ती बनवली आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजता धर्मवीर संभाजी चौकात १८ फूट उंचीच्या ‘बेळगावच्या राजा’ चे दिमाखात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. दरम्यान पाऊस थांबला आणि बेळगावच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळताच गणेश भक्तांनी जल्लोष केला. विशेष म्हणजे सीमाभागातील हा सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा पाहण्यासाठी बेळगावच्या कानाकोपऱ्यासह ग्रामीण भागातील भाविक सायंकाळ पासूनच धर्मवीर संभाजीराजे चौकात जमले होते. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बेळगावातील सुप्रसिद्ध ‘बेळगावचा राजा’ गणपतीच्या पहिल्या लूकचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यानंतर पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते मुरगेंद्रगौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू कडोलकर, रोहित रावळ यांच्याहस्ते ‘बेळगावचा राजाचे’ पूजन करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार , कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्री ९ वाजल्यांनंतर परिसरात गर्दीचा महापूर आला होता. रात्री आठ वाजेपर्यंत हजारो गणेशभक्त एकत्र येत होते. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. बेळगावचा राजा आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढोल-ताशा पथक व इतर वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन साऊंड सिस्टीम असलेली वाहने मूर्तीजवळ पोहोचू दिली नाहीत.
या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे यंदाही सायंकाळी ६ वाजल्यापासूनच धर्मवीर संभाजी चौक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त होता. पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली मार्केट व खडेबाझर सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक १० पोलिस अधिकारी येथील परिस्थितीवर नजर ठेऊन होते. परगावचे नागरिकही आगमन सोहळा पाहण्यासाठी थांबल्याने येथील वाहतूकही विस्कळीत झाली. तरुणाईच्या गर्दीने फुलून गेला. रात्री उशिरापर्यंत येथे सळसळता उत्साह पाहायला मिळाला.