• सभापती बसवराज होरट्टी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथे येत्या ८ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती बसनराज होरट्टी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनासाठी संमती दर्शविली आहे.

धारवाड येथे माध्यमांशी बोलताना होरट्टी म्हणाले, “आमदारांमध्ये विकास विषयांबाबत आवश्यक गांभीर्य दिसत नाही. उत्तर कर्नाटकातील समस्या अधोरेखित करण्यासाठी दर बुधवार आणि गुरुवारी विशेष वेळ राखून ठेवण्यात आला आहे, तरीही त्या भागातील आमदार बोलत नाहीत. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत मी सर्व आमदारांना परिपत्रक पाठवणार आहे, ज्यामध्ये उत्तरेकडील प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, यावर भर दिला जाईल,” असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले, “जोपर्यंत राज्यात पैसे घेऊन-देऊन मतदान करण्याची प्रथा सुरू आहे, तोपर्यंत लोकशाहीत खरा विकास होणे अवघड आहे. सध्या प्रश्न विचारणारे आमदारही चर्चेतून काही वेळातच निघून जातात. या परिस्थितीत राज्याचा विकास करणे हे मोठे आव्हान बनले आहे.”

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, “नोव्हेंबर असो वा डिसेंबर, क्रांती करणारे आणि ज्यांच्यावर क्रांती होणार आहे ते सर्व एकाच ठिकाणी आहेत. आम्ही फक्त पाहत आहोत. माध्यमांमध्ये केवळ या विषयांवरच चर्चा होत असून जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. आमदारांनी राज्यातील प्रलंबित कामांवर चर्चा केली पाहिजे. सभापती म्हणून हे सांगणे माझे कर्तव्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.

प्रताप सिम्हा आणि प्रदीप ईश्वर यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना होरट्टी म्हणाले, “ज्यांच्यात माणुसकी आहे, ते असे वक्तव्य करू शकत नाहीत. आमदारांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श घालावा. समाजासमोर आदर्श ठेवण्याचे भान आज आमदारांमध्ये दिसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.