• सुळगा (हिं.) परिसरात चार दुचाकीस्वार जखमी
  • सार्वजनिक बांधकाम खात्याने समस्येकडे लक्ष द्यावे नागरिकांतून मागणी

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव–वेंगुर्ला मुख्य रस्त्यावरील सुळगा परिसरात सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे रस्त्यावर टाकलेली खडी वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी या खडीवरून घसरून चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उचगाव क्रॉस ते बाची या दरम्यान रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र कामाचा वेग अत्यंत मंद असून, रस्त्यावर टाकलेल्या खडीचा थर अनेक दिवसांपासून तसाच पडून आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना तोल संभाळणे कठीण जात आहे. धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

खडीमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रवाशांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने खडी नीट दाबून रस्ता समतल करण्याची तसेच पर्यायी मार्गाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. अखेर दुरुस्तीला सुरुवात झाली असली तरी काम कधी पूर्णत्वास जाणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.