बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर आणि परिसरात वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगसाठी अपुरी व्यवस्था या समस्या गंभीर बनत आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याबाबत महापालिका बैठकीत चर्चा करण्यात आली. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात आज बुधवार (दि. १२ नोव्हेंबर) रोजी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

प्रामुख्याने शहरातील अनेक ठिकाणी उद्भवणाऱ्या वाहतूक आणि रहदारी समस्या यांचे निवारण करण्यासाठी मनपा यंत्रणेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रहदारी पोलीस यंत्रणेने देखील याकामी सहकार्य करावे. रहदारी पोलिसांकडून राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना योग्य कार्यवाही व्हावी अशा सूचना नगरसेवकांनी केल्या. शहराच्या बाजारपेठेतील पार्किंगच्या समस्येवर जोरदार चर्चा करण्यात आली.

शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरी भागांमध्ये देखील समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. याबाबत दक्षता घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या. शहरातील नागरी समस्यांच्या संदर्भात मनपा यंत्रणे कडून योग्य दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने तत्परतेने पावले उचलावीत अशी मागणी उपस्थित नगरसेवकांनी केली.

शहराच्या व्यापारी पेठेतील अनेक आस्थापनांनी आपल्या तळघरांमध्ये व्यवसाय थाटले आहेत. याबाबत यापूर्वी सूचना करून देखील हे व्यवसाय हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पार्किंग समस्या गंभीर होत आहे. यापुढील काळात व्यापारी आस्थापनांना पार्किंग सक्तीचे करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.

नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांच्यासह संतोष पेडणेकर यांनी विविध सूचना मांडल्या. महापौर मंगेश पवार यांच्यासह अधिकारी वर्गाने याला उत्तरे दिली.