बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकातील विविध राज्यस्तरीय जूडो स्पर्धांमध्ये बेळगाव क्रीडा हॉस्टेलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक सुवर्णपदके पटकावली असून, त्यापैकी अनेक जण राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले आहेत.
रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी येथे ७ व ८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्य जूडो स्पर्धेत तुकाराम लमाणी, वैभव पाटील, नेत्रा पत्रावळे, अंजली पाटील, दर्शन पाटील आणि धनुष्य एल. यांनी सुवर्णपदके मिळवून उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्रता मिळवली.
१३ ऑक्टोबर २०२५ रोजी बेळगाव येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन जूडो स्पर्धेत भूषण वनारसे, सौरभ पाटील, रोहन बी.एस., राधिका डुकरे आणि सायश्वरी कोडचवाडकर यांनी विजेतेपद मिळवत भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी स्थान निश्चित केले.
२५ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान बेळगावात झालेल्या राज्यस्तरीय शालेय जूडो स्पर्धेत आसिमा सल्मानी, मेघना मुल्या, कावेरी सूर्यवंशी, आरती मुरकुटे, सहाना बेलगली, वैष्णवी भडांगे, वैभव पाटील, अंजली पाटील, श्लोक कातकूर, तेजस आणि श्रेयल कौरी यांनी सुवर्णपदके पटकावत राजस्थान व मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्रता मिळवली.
तसेच २७ व २८ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रदुर्ग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पदवीपूर्व जूडो स्पर्धेत स्पंदना, श्र्वेता अलकनूर, दिव्या पाटील, सोनालिका सी.एस., आफ्रिन बानू, संगमेश मडली, बसलिंगय्य अथनिमठ, धनुष्य एल., आर्यन डोंगले, चंद्रशेखरगौड आणि प्रथमेश पाटील यांनी सुवर्णपदक जिंकून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय जूडो स्पर्धांसाठी आपले स्थान निश्चित केले.
या यशाबद्दल युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाचे उपसंचालक श्री. बी. श्रीनिवास, जूडो प्रशिक्षक कु. रोहिणी पाटील व सौ. कुतुजा मुल्तानी, तसेच कर्मचारी वर्गाने सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








