• मटका, जुगार आणि गांजा विक्रीत सक्रिय आरोपींवर निर्बंध
  • सहा महिन्यांची प्रवेशबंदी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील मटका, जुगार आणि गांजा विक्रीसारख्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करत तीन कुख्यात आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या आरोपींना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहापूरचा सरफराज शेख, टिळकवाडीचा विनायक कोल्हापुरी आणि होसूरचा सागर सालागुडे यांचा समावेश आहे. या तिघांवर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल असून ते वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत होते. वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्यांच्या विरोधात कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ५५ व ५६ अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली.

आदेशानुसार या आरोपींना पुढील सहा महिन्यांसाठी विजयपुरा, कारवार आणि यादगीर जिल्ह्यांमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.