बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळीच्या काळात वातावरणात धूर, फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण आणि धूळकण यामुळे हवेची गुणवत्ता घसरते. यावर्षीही याला अपवाद राहिला नाही. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, बेळगाव हे कर्नाटकातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचले आहे.
‘गरिबांचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे बेळगाव यादीत स्थान मिळाल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या अहवालात हावेरी शहर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित ठरले असून, तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ९८ इतका नोंदवला गेला आहे.
यादीत हुबळी तिसऱ्या आणि धारवाड पाचव्या क्रमांकावर असून, त्यांच्या हवेचे निर्देशांक अनुक्रमे ८६ आणि ७७ इतके आहेत. बेळगावच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ७६ इतका असल्याचे समोर आले आहे म्हणजेच बेळगाव आणि धारवाडच्या प्रदूषण पातळीत केवळ एका अंकाचा फरक आहे.
हवेतील धूळकण, वाहनधूर, बांधकामातील धुळीचा पसारा आणि फटाक्यांमुळे निर्माण होणारे रासायनिक घटक हे वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.








