- चौघांना अटक ; एनडीपीएस आणि उत्पादन शुल्क कायद्यान्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थांचे सेवन तसेच बेकायदेशीर मद्यविक्रीविरुद्ध कडक मोहीम राबवत सलग चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अंमली पदार्थविक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरली आहे.
- सार्वजनिक ठिकाणी ड्रग्ज सेवन करणारे तिघे अटकेत :
शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव परिसरात, जेल स्कूलजवळील सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करून गोंधळ माजवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी चेतन जगदीश कार्लेकर, सूरज शिवनाथ अन्वेकर आणि दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रवीण मनोहर नायक या तिघांनी ड्रग्जचे सेवन केल्याची खात्री पटताच, शहापूर पोलिस स्थानकाचे पीआय एस. एस. सिमानी आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली. आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले. पुढील तपास शहापूर पोलिसांकडून सुरू आहे.
- अवैध मद्यविक्री करणाऱ्या युवकाला अटक :
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या पथकाने अवैध मद्यविक्रीविरोधात केलेल्या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी, चांदूर गावाजवळील बेळगाव–गोकाक मार्गावर असलेल्या भूमिका ढाबा हिंदूगडे येथे मंजुनाथ मारुती काशी (वय २६) हा कोणत्याही परवान्याशिवाय दारूची विक्री करत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. सीपीएसआय चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून मंजुनाथला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ३,०००/- रुपये किमतीची अंदाजे २० लिटर अवैध दारू व रोख रु. १३०/- असा एकूण ३,१३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.
- पोलिस दलाचे वरिष्ठांकडून कौतुक :
ही कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी संबंधित पोलिस अधिकारी, उपनिरीक्षक आणि कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. शहरातील गुन्हेगारी आणि अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशी मोहीम सातत्याने सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.








