• स्वच्छता मोहिमेला मिळणार नवी दिशा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने तेथील घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेच्या आधुनिक पद्धती आणि नागरिकांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती घेतली.

महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हणमंत कोंगाळी तसेच सर्व नगरसेवकांनी या अभ्यास दौर्‍यात सहभाग घेतला. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेळगावच्या प्रतिनिधींना स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तांत्रिक उपाययोजना आणि जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. शिष्टमंडळातील सदस्यांनी इंदूरमधील कचरा–ते–संसाधन प्रकल्प, विभक्त कचरा संकलन प्रणाली, आणि शहराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या अभ्यास दौऱ्यामुळे बेळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी नवीन कल्पना मिळाल्या असून, इंदूरमधील सर्वोत्तम पद्धती बेळगावमध्ये राबविण्याचा मनोदय सदस्यांनी व्यक्त केला. शिष्टमंडळाचा हा दौरा बेळगावला स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.