बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेचे नूतन आयुक्त म्हणून कार्तिक एम. यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या शुभा बी. यांची अचानक बदली करण्यात आली असून त्यांना पुढील नियुक्ती मिळेपर्यंत मूळ विभागात कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बंगळुरू येथील संजय गांधी ट्रॉमा अँड ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहणारे कार्तिक एम. आता बेळगाव महापालिकेचे नवे प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना कार्तिक एम. म्हणाले की, “बेळगाव हे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. नागरिकांना महापालिकेच्या सेवांचा सहज व पारदर्शक लाभ मिळावा यासाठी प्रशासनिक गती वाढवू. अमृता योजना तसेच प्रलंबित विकास प्रकल्पांचे योग्य नियोजन करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून कामाला गती दिली जाईल.”
यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नूतन आयुक्तांचे स्वागत केले.








