बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधून मुंबई शहराला रविवार, दि. २९ मार्चपासून दोन विमानफेऱ्या सुरू होत आहेत. मुंबई व नवी मुंबई या दोन्ही विमानतळांसाठी सेवा उपलब्ध झाल्यामुळे बेळगावमधील व्यापारी-उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यामुळे प्रवाशांना सकाळी मुंबईत पोहोचून रात्री परत येण्याची सुविधा मिळणार आहे. या मार्गावर विमानसेवा डिसेंबर २०२५ पासून स्टार एअरने थांबविली होती, ज्यामुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनने विमानतळ प्राधिकरणाकडे मागणी केली होती, तर खासदार जगदीश शेट्टर यांनी इंडिगो एअरलाईन्ससोबत चर्चा करून सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
याअनुषंगाने इंडिगो एअरलाईन्सने बेळगाव–नवी मुंबई मार्गावर सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, तर स्टार एअरने बेळगाव–मुंबई मार्गावर आपली सेवा पुन्हा सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवाशांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
- विमानसेवा वेळापत्रक:
इंडिगो एअर : सकाळी १०:२० वाजता नवी मुंबईतून निघणार, सकाळी ११:४५ वाजता बेळगावात पोहोचणार. परतीची वेळ – सायंकाळी ५:३५ वाजता बेळगावहून निघून ६:५० वाजता नवी मुंबई पोहोचणार.
स्टार एअर : सकाळी ७:२० वाजता बेळगावहून निघणार, ८:२५ वाजता मुंबईत पोहोचणार. परतीची वेळ – सायंकाळी ७:४५ वाजता मुंबईहून निघून रात्री ८:५० वाजता बेळगाव पोहोचणार. बेळगावहून मुंबईला फक्त १ तास १५ मिनिटांत पोहोचता येणार आहे, जे व्यवसायी व प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे.








