• कोल्हापूर येथील शिवसेना नेते विजय देवणे यांचा इशारा

कोल्हापूर : “कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन जर बेळगाव महापालिकेत मराठी विरोधी ठराव मंजूर झाला, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू. बेळगावातील मराठी भाषिकांच्या भावनांशी खेळ सहन केला जाणार नाही.” असा स्पष्ट इशारा कोल्हापूर येथील शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी दिला आहे.

बेळगाव शहरातील सीमावाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २००५ साली बेळगाव महापालिकेत मंजूर झालेल्या मराठी ठरावाविरोधात नवीन ठराव आणण्याच्या हालचालींना गती मिळाल्याचे संकेत आहेत. विशेषतः कन्नड संघटनांकडून वाढलेल्या दबावामुळे हा ठराव मांडला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने संभाव्य ठरावाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

सध्या बेळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून महापौर व उपमहापौर कन्नड भाषिक आहेत. त्यामुळे महापौरांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कन्नड संघटनांनी महाजन आयोगाची अंमलबजावणी करून सीमाप्रश्न संपल्याचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी जोरदारपणे केली आहे.

२००५ साली मंजूर झालेला ऐतिहासिक ठराव “सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात यावा” असा होता. त्याला विरोध म्हणून सध्या कन्नड संघटना आक्रमक झाल्या असून ठराव रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे संकेत आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीनेही या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समितीच्या मते, मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील महापौरांना सावधान केले आहे की असा ठराव मंजूर केला तर शहरात मोठा उद्रेक होऊ शकतो.

एकंदरीत, या सर्व घडामोडींमुळे बेळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात मोठ्या आंदोलनांची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या बैठकीत निर्णय काय होतो आणि प्रशासन कशी भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे.