बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या अशोकनगर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज उद्घाटन झाले. माजी आमदार फिरोज सेठ यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या या तलावाचे लोकार्पण उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, नगरसेवक रियाझ किल्लेदार, महानगरपालिका आयुक्त शुभा बी. आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
उद्घाटनप्रसंगी आमदार आसिफ सेठ म्हणाले, “बेळगावातील जलतरणपटूंसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तब्बल ५० मीटर लांबीचा हा तलाव माझे बंधू व माजी आमदार फिरोज सेठ यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी उभारला होता. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू बेळगावातून घडावेत, तसेच गरीब व मध्यमवर्गीय मुलांनाही प्रशिक्षणाची संधी मिळावी, या हेतूने हे स्वप्न साकारले होते. लवकरच विनायकनगर व जाधव नगर येथेही अशाच तलावांचे उद्घाटन होणार आहे.”
महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले, “आमदारांच्या निधीतून उभारलेल्या या तलावाच्या उद्घाटनात तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने, नगरसेवक, आभा फाउंडेशन आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला. बेळगावातील खेळाडू, सरकारी शाळेतील मुले आणि गरजूंसाठी माफक दरात या तलावाचा लाभ उपलब्ध करून दिला जाईल.”
आभा स्पोर्ट्सचे प्रमुख पवार यांनी सांगितले, “आमदारांच्या सहकार्यामुळे अशा दर्जेदार जलतरण तलावाचे लोकार्पण शक्य झाले. अशोकनगरमधील हा ऑलिंपिक दर्जाचा तलाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक जलतरणपटू घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रकल्प अखेर साकारल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानतो.”