- कोल्हापूर सर्कलजवळ भीषण अपघात
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कल परिसरात आज सकाळी ११ वा. सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध रस्ता ओलांडत असताना बिम्सच्या दिशेने वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती, की वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच उत्तर वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला अटक केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या अपघातानंतर कोल्हापूर सर्कल परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या मते, येथे सिग्नल वारंवार बंद पडतात किंवा काही वेळासाठी बंद ठेवले जातात, ज्यामुळे वाहनचालक गोंधळात पुढे निघून जातात.
स्थानिकांनी आरोप केला आहे की, वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त पोलिस अनेकदा बघ्याची भूमिका घेतात, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा वाढतो. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने वाहतूक अधिकच विस्कळीत झाली आहे. परिणामी, कोल्हापूर सर्कल परिसर हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.








