बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावकर जनतेचा बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्प, नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पत्रकार भवनाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढील महिन्यात उद्घाटन करतील, असे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

बेळगाव शहरातील जिल्हा क्रीडांगणावर पार पडलेल्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पाटबंधारे विभागाने बेळगाव जिल्ह्यातील १ लाख हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून तलाव भरण्याच्या प्रकल्पाला महत्त्व दिले जात आहे.

२१५ कोटी रुपये खर्चून सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघाच्या व्यापक विकासाकडे वाटचाल करणाऱ्या सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्री एच.के.पाटील यांनी सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघाच्या विकासाची विशेष काळजी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी ५५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर पत्रकार भवनाच्या नूतन इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १० कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

बेळगावकर जनतेच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाचा पहिला टप्पा संकम हॉटेलपासून सुरू होईल आणि अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, बोगारवेस सर्कल येथे संपेल. हे ४.५ किमीचे उड्डाणपुलाचे काम आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०० कोटी रुपये खर्च केले जातील. हे काम सप्टेंबरमध्ये सुरू केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, २०१३ मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात सुरू झालेली विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतः करतील. जिल्हा क्रीडांगणासाठी दरवर्षी १० कोटी रुपये खर्च करण्यासह एक सुसज्ज स्टेडियमही बांधले जाईल,असे ते म्हणाले.

यावेळी आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण गुलबाराव बोरसे आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते.