- पूरस्थिती नियंत्रणात
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून बेळगाव जिल्ह्याला आता पुराचा धोका नाही. आम्ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत. पावसामुळे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात पूरस्थिती नाही. पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. २२१ घरांचे अंशतः तर दोन घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात आली आहे. १४० हेक्टर शेती जमीन पुरामुळे बाधित झाली आहे, त्यापैकी ५.२५ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील हिडकल जलाशय ९० टक्के, नवीलुतीर्थ जलाशय ७८ टक्के आणि मार्कंडय जलाशय ९० टक्के भरले आहे. सध्या महाराष्ट्रातून चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ बॅरेजमध्ये ४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जर २ लाख पाण्याचा विसर्ग झाला तर पूर परिस्थिती निर्माण होईल. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
“जर महाराष्ट्रातील विविध जलाशयांमधून पाणी सोडले तर ते पाणी आपल्या जिल्ह्यातील नद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ४ ते ५ दिवस लागतात. आपल्या जिल्ह्यातून अलमट्टी धरणापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी ७ दिवस लागतात. महाराष्ट्रातील विविध जलाशयांमधून किती पाणी सोडले जात आहे याबद्दल आम्ही दररोज कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत,” असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले.
