बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्योत्सव आणि त्याच दिवशी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘काळा दिन’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हातकणंगलेचे खासदार व तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते विजय देवणे आणि संजय पवार यांना १ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश काढण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, भारतीय नागरी संरक्षण संहिता कलम 163 अंतर्गत ही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावात भाषिक संवेदनशीलता वाढण्याची शक्यता आणि कायदा–सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना संबंधित सुमारे २५ कार्यकर्त्यांनाही हीच अट लागू केली असून, त्यांना १ नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या शिफारशीवरून हा आदेश काढण्यात आल्याचे सांगितले जाते.

शिवसेना नेते विजय देवणे यांनी सीमावासीयांना समर्थन देण्यासाठी निपाणीमार्गे बेळगावात येण्याची घोषणा केली होती. यानंतरच प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी हा प्रतिबंधात्मक आदेश दिला. राज्योत्सव, काळा दिन आणि सीमाभागातील परिस्थिती लक्षात घेता कुठलाही तणाव निर्माण होऊ नये, हा निर्णयाचे प्रमुख कारण असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.