- पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा : नागरिकांच्या मागणीला यश
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीला अखेर यश आले आहे. बेंगळूर – बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रविवार दि. १० पासून धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी बेंगळूर दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्याहस्ते या वंदे भारतचे उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वंदे भारत सुरू होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये बेळगाव – बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेससाठी चाचणी घेण्यात आली होती. सुरुवातीला बेंगळूर – धारवाड वंदे भारत एक्सप्रेस बेळगाव पर्यंत वाढवावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतु त्याला हुबळी – धारवाडच्या नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यास बराच विलंब लागला. अखेर रेल्वे बोर्डाने या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्सप्रेस पहाटे ५.२० वा. बेळगाव मधून निघणार असून दुपारी १.३० ला बेंगळूरला पोहोचेल. तर बेंगळूर येथून दुपारी २.२० वा. निघालेले वंदे भारत रात्री १०. ४० वा. बेळगाव ला पोहोचणार आहे. वर्षभरापूर्वी पुणे – हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. त्यानंतर आता बेळगाव मधून धावणारी दुसरी वंदे भारत सुरू होणार आहे. तर राज्यातील ११ वी वंदे भारत धावणार आहे.
- बेळगावकरांना वंदे भारतचा उपयोग होईल का ?
बऱ्याच प्रयत्नानंतर बेंगळूर – बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. परंतु वेळापत्रकामुळे लोकप्रतिनिधी सह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पहाटे ५.१५ वा. प्रवासी पोहोचतील का? तसेच रात्री ११ वा. बेळगावमध्ये आल्यावर शहरातील उपनगरासह ग्रामीण भागांमध्ये जाण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. सध्या असलेले वेळापत्रक पाहता प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नाही आणि त्यामुळे लवकर एक्सप्रेस बंद करण्यासाठीचे प्रकार सुरू असल्याची चर्चा केली जात आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली जात आहे.