• मेस आणि रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकासाठी चुलींचा वापर
  • पोळी – भाकरीचे जेवण बंद

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे शहरातील मेस आणि रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. गॅसच्या अभावामुळे लाकडी चुलीवर स्वयंपाक करण्यास भाग पडलेल्या मालकांना आता आर्थिक आणि वेळेच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आणि स्टुडंट मेसना स्वयंपाक करताना मोठा ताण येत आहे. भडकल गल्लीतील दुर्गादेवी रेस्टॉरंटमध्ये सध्या लाकडी चुलीवर स्वयंपाक सुरू आहे. रोजच्या ग्राहकांची आणि विद्यार्थ्यांची भूक भागवण्यासाठी मालक लाकडाचा अवलंब करीत आहेत.

लाकडी चुलीच्या वापरामुळे रेस्टॉरंट मालकांवरील आर्थिक भार दुप्पट झाला आहे. सध्या एक किलो लाकडाची किंमत ९ रुपये असून, दिवसाला २५ किलोपेक्षा जास्त लाकूड लागते. यामुळे नफ्यापेक्षा खर्च जास्त होत असला तरी ग्राहकांच्या हितासाठी जेवणाच्या किमतीत बदल न करता जुन्या दरातच सेवा देत आहेत, असे मालकांनी सांगितले. मात्र, लाकडी चुलीवर गरमागरम पोळ्या बनवणे हे खूप आव्हानात्मक काम असल्याने पोळ्यांचे वाटप सध्या थांबवण्यात आले आहे.

गॅस पुरवठ्याच्या विलंबामुळे लहान हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. व्यावसायिक सिलिंडर्सचा तुटवडा कायम राहिल्यास बाहेरच्या जेवणावर अवलंबून असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आणि कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागेल.

या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट मालकांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.