• हजारो ‘म्युअल अकाउंट्स’चा गैरवापर

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात सायबर गुन्हेगारीचे मोठे जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले असून तब्बल २ हजार ९९२ ‘म्युअल अकाउंट्स’च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

तपासादरम्यान शहरातील २ हजार ९९२ म्युअल अकाउंट्स कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी ७७२ खात्यांमधून फसवणुकीचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित खात्यांची केवायसी माहिती गोळा करण्यात येत असून खातेदारांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर पुढील काळात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सायबर गुन्हेगारांकडून मित्र, ओळखीचे व्यक्ती किंवा नोकरीच्या आमिषाने सामान्य नागरिकांची बँक खाती वापरली जात आहेत. या खात्यांद्वारे फसवणुकीची रक्कम वळवली जात असल्याने नागरिकांनी आपली खाती इतरांना वापरण्यास देऊ नयेत, अन्यथा खातेदारालाही गुन्ह्यात सहआरोपी ठरवले जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अगदी परिचित व्यक्तीकडून आलेल्या संदेशांतील लिंकबाबतही दक्षता बाळगावी, असे सांगण्यात आले. सायबर फसवणुकीपासून बचावासाठी जागरूकता आणि सतर्कता हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.