• ऐतिहासिक देखावे आणि मर्दानी खेळांना प्राधान्य
  • शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाचे नियोजन

बेळगाव : बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक यंदा अधिक शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.

शिवजयंतीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक दिनापर्यंत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासनाने घातलेल्या अटी मान्य करून कोणताही गोंधळ न करता यंदाची शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सुनील जाधव यांनी सांगितले.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी मिरवणुकीदरम्यान पोलीस, इस्कॉन, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन आणि रुग्णवाहिका सेवा यांचा समावेश असलेला एकच ‘मदत कक्ष’ स्थापन करण्याची मागणी केली. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिवभक्तांना एकाच ठिकाणी सर्व मदत मिळावी, ही मागणी प्रशासनाने तात्काळ मान्य केली आहे.

मिरवणुकीत यंदा ऐतिहासिक देखावे आणि मर्दानी खेळांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. डीजे लावून हिडीस नृत्य करणाऱ्या तसेच इतर मंडळांच्या सादरीकरणात अडथळा निर्माण करणाऱ्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही. अशा मंडळांचे चित्ररथ मिरवणुकीच्या शेवटी पाठवले जातील आणि मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारी डॉल्बी सिस्टीम जप्त केली जाईल.

तसेच सादरीकरणावेळी कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिले आहेत.

या बैठकीला शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण – पाटील, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.