- चंदीगडमध्ये आंतरविद्यापीठ ज्युडो स्पर्धेत दमदार कामगिरी
बेळगाव : जिल्ह्यातील धामणे गावची युवा ज्यूडोपटू राधिका डुकरे हिने चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत महिलांच्या ७० किलो गटात रौप्यपदक पटकावून बेळगाव आणि कर्नाटक राज्याचा मान उंचावला आहे.
१८ ते २२ मार्च २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने खेळताना राधिकाने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ सादर केला. पहिल्या फेरीत तिने पंजाब विद्यापीठाच्या किरणदीप कौर हिला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर हरियाणा विद्यापीठाच्या कोमलवर मात करत पुढील फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्र विद्यापीठाच्या रितुबेन वाजा हिला इप्पॉनने हरवून तिने आपली ताकद दाखवून दिली.
उपांत्य फेरीत चंदीगड विद्यापीठाच्या खुशीवर विजय मिळवत राधिकाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात एलएनआयपी विद्यापीठाच्या चाणूविरुद्ध तिने कडवी झुंज दिली, मात्र थोडक्यात पराभव स्वीकारावा लागल्याने ती रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सध्या राधिका डुकरे ही डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथे एनआयएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिच्या या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ आणि डीवायईएसचे उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
राधिकाच्या या यशामुळे धामणे गाव, राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल यांचा नावलौकिक वाढला असून, बेळगाव परिसरात ज्युडो खेळाच्या उज्ज्वल भविष्यास नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसत आहे.








