• सात दिवसांत किमान तापमानात आठ अंशांनी वाढ

बेळगाव : उन्हाळा ऐन मध्यावर आला असल्यामुळे रविवारी (दि. १२) बेळगावचे तापमान ३८ अंशांवर पोहोचले असून साप्ताहिक सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थाने ‘हॉट संडे’ ठरला. गेल्या सात दिवसांत कमाल तापमानात पाच तर किमान तापमानात तब्बल आठ अंशांनी वाढ झाली आहे.

बेळगावात एप्रिल महिन्यात सरासरी तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान असते. मात्र, यंदा तापमानाने ३८ अंशांचा टप्पा गाठल्याने उष्णतेचा तीव्र त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.

किमान तापमान २४ अंशांवर स्थिर असून त्यातही घट होत नसल्याने उष्णतेचा प्रभाव दिवस-रात्र जाणवत आहे. परिणामी, घरोघरी पंखे आणि वातानुकूलित यंत्रे दिवसभर सुरू ठेवावी लागत आहेत. आगामी काळातही तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या सात दिवसांत कमाल तापमानात पाच अंशांनी, तर किमान तापमानात आठ अंशांनी वाढ झाल्याने उकाडा असह्य झाला आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. वारंवार पाणी पिणे, प्रखर उन्हात बाहेर पडणे टाळणे, तसेच सैल आणि सुती कपड्यांचा वापर करणे, असा सल्ला देण्यात येत आहे.