- कोट्यवधींची संपत्ती उघड
बेळगाव : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जिल्हा शहरी विकास कक्षाचे सहायक कार्यकारी अभियंता अजय सिंह राजपूत यांच्या निवासस्थानांसह विविध मालमत्तांवर मंगळवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकून मोठी कारवाई केली.
शहरातील अंजनेयनगर येथील निवासस्थानासह अथणी व हुक्केरी परिसरातील मालमत्तांवर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान तपासात एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या बँक खात्यांमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम जमा असल्याचेही उघडकीस आले आहे.

दरम्यान, बेळगाव शहरात एकमेकांना लागून असलेली तीन घरे त्यांच्या मालकीची असल्याचे समोर आल्याने त्यांच्या मालमत्तेच्या स्त्रोताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
डीवायएसपी बी.एस. पाटील व भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू असून, अधिक कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे.








