• पोलीस आयुक्तांचे आदेश

बेळगाव : शहरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रिक्षा व्यवसायात शिस्त आणण्यासाठी आता प्रत्येक रिक्षाचालकाला ओळखपत्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनधिकृत रिक्षा व्यवसायावरही नियंत्रण आणण्यास मदत होणार असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.

बैठकीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, रिक्षांमध्ये चालकाचे ओळखपत्र लावल्यास प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री मिळेल आणि चालकांनाही याचा फायदा होईल. याशिवाय शहरात सध्या भेडसावत असलेल्या पीएनजी गॅसच्या टंचाई आणि दरवाढीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

रिक्षाचालकांनी तक्रार केली की, सरकारी गॅस पंपांची संख्या कमी असून खाजगी पंपावर गॅस चढ्या दराने विक्री होत आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे. रिक्षाचालकांनी न्याय मिळावा आणि गॅस दरांच्या तक्रारींची चौकशी व्हावी, अशी मागणी बैठक दरम्यान केली.