- अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
शहरात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलसाठी लागणाऱ्या लांब रांगांच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव शहर पोलिसांनी पेट्रोल पंप मालकांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीला पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमनी उपस्थित होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पंप मालकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
बैठकीत सर्व पेट्रोल पंपांवर “पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, घाबरून खरेदी करू नका” असे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल देण्यास सक्त मनाई करण्यात आली.
पंपांवर गर्दी किंवा गोंधळ झाल्यास तात्काळ ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या. याशिवाय पोलिसांची ‘होयसळा’ व पेट्रोलिंग वाहने २४ तास तैनात राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







