• दोघांना अटक

बेळगाव : शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवून मटका जुगार करणारा आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकूण दोघांना ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई एपीएमसी आणि खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत करण्यात आली.

मार्कंडेयनगर भागात मटका खेळत असलेल्या शुभम व्यंकटेश रेड्डी याला एपीएमसी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एस. आर. मत्तट्टी आणि पथकाने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने किशन सुरेश भजंत्री याला पैसे पुरवत असल्याचे कबूल केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत, खडेबाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय आनंद आदगोंडा आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ सेवन करत धिंगाणा घालणाऱ्या साई विनायक प्रधान याला अटक केली. संशयिताची वैद्यकीय चाचणी करून त्यावर कारवाई करण्यात आली.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम सुरू असून, पोलीस प्रशासनाने यशस्वी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. अवैध धंद्यांविरुद्ध अशी कारवाई भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.