• १४०० संशयास्पद बँक खात्यांवर पोलिसांची नजर
  • जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात सायबर फसवणुकीसाठी संशयास्पद बँक खात्यांचा वापर वाढत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीपी सीआयडी कार्यालयाच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यात एकूण १४०० संशयास्पद बँक खात्यांवर पोलिसांची नजर ठेवण्यात आली आहे.

सोमवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांनी विविध बहाण्यांनी अनेक लोकांच्या नावावर बँक खाती उघडून त्यांचा गैरवापर केला आहे. आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे. निपाणी येथील रहिवासी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; त्यांनी स्वतःच्या नावावर बँक खाती उघडून ती इतरांना दिली आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये ५ खात्यांवर एकूण १४ गुन्हे दाखल असून, त्यात सुमारे ४६,१२,५५१ रुपये गुंतलेले आहेत.

चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावातील दोन आरोपींनी ओळखीच्या लोकांची फसवणूक करून बँक खाती, पासबुक, एटीएम आणि सीम कार्ड मिळवले व त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला. या प्रकरणात १५ बँक खात्यांमार्फत ४२,१३,०७६ रुपये व्यवहार झाले असून, देशभरात विविध ठिकाणी ६८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रामदुर्ग तालुक्यातील मणिहाल गावातील एका आरोपीने स्वतःच्या नावावर अनेक बँक खाती उघडून सायबर गुन्ह्यांसाठी वापरले. देशातील विविध राज्यांमध्ये ४ खात्यांवर ८ गुन्हे दाखल असून, व्यवहाराची रक्कम १४,३१,३०१ रुपये आहे. आरोपीची चौकशी व घराची झडती घेण्यात आली असून, तपास सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, अनोळखी व्यक्तींना आपले बँक खाते, एटीएम किंवा सीमकार्ड देऊ नका, तसेच सायबर फसवणुकीत सहकार्य केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.