बेळगाव : शहरातील एका वृद्धाच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची डिजिटल फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आतापर्यंत १ कोटी रुपये ब्लॉक करण्यात यशस्वी झाले असून, उर्वरित रकमेचा शोध घेण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करत आहेत.

पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, फसवणूक झालेली रक्कम अहमदाबाद, कोलकाता, गुवाहाटी, हरियाणा आणि दिल्ली येथील १० बँक खात्यांमध्ये विभागण्यात आली होती. प्राथमिक तपासात हैदराबादमध्ये श्रीपाद नायक आणि शरद नायक यांनी एका खाजगी कंपनीच्या नावावर बनावट खाते तयार करून ही रक्कम वळवली असल्याचे समोर आले आहे. या आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले की, १० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या प्रकरणात सरकारी नियमांनुसार तपास सीबीआयकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाची कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यासाठी तयारी पूर्ण केली जात आहे.

या प्रकरणामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलीस प्रशासन या फसवणुकीच्या आरोपींवर कठोर कारवाई करत असून, उर्वरित रक्कमेचा शोध लवकरच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगाव शहरात २९०० म्युल बँक खाती सक्रिय आहेत असेही तपासात उघड झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून आपली बँक खाती कोणालाही भाड्याने देऊ नयेत, असा आवाहन भूषण बोरसे यांनी केले.