- प्रसिद्ध गायिका सौ. चंद्रज्योती देसाई यांच्यावतीने आयोजन
- मुलांना सूरांची गोड ओळख करून देण्याची ‘सुवर्णसंधी’
- शिबिरात जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचे पालकांना आवाहन
बेळगाव : शहरातील प्रसिद्ध गायिका, हार्मोनियम वादक आणि संगीत शिक्षिका सौ. चंद्रज्योती देसाई यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘हसत खेळत संगीत शिबिर’ या विशेष उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या शिबिराच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण करत त्यांच्यावर संस्कार करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १००० हून अधिक मुलांना त्यांनी सहज, सोप्या आणि खेळकर पद्धतीने संगीताचे प्राथमिक धडे दिले आहेत.
यंदाचे दहावे ‘हसत खेळत संगीत शिबिर’ १ एप्रिल ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत चिटणीस इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दररोज सायंकाळी ३ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षी ‘वंदे मातरम्’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिबिरार्थींना विविध गाण्यांसोबत ‘वंदे मातरम्’ची सर्व पाच कडवी शिकवून त्याचा जाहीर कार्यक्रम सादर करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
या शिबिरात मुलांना संगीताचे प्राथमिक शिक्षण, ताल-लय, गाणी आणि सादरीकरणाची संधी अशा विविध अंगांनी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
आपल्या मुलांना संगीताची गोडी लागावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी पालकांनी या शिबिरात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजिका सौ. चंद्रज्योती देसाई यांनी केले आहे. इच्छुकांनी दिलेल्या व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करून शिबिराच्या गटात सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.








