• जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्याहस्ते ध्वजारोहण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

सोमवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रगीताच्या तालावर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधान आणि कायद्याचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी असून, ती पार पाडताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि नागरिकांविषयी संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी के. रामराजन यांनी जिल्ह्यातील नागरिकांना तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास जिल्ह्यातील विविध विभागांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.