- मार्केट पोलिसांची कारवाई ; मटका प्रकरणात महिलाही ताब्यात
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने मार्केट पोलिसांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून कारवाई करत शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. तसेच स्वतंत्र कारवाईत मटका जुगार चालवणाऱ्या एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले.
सोमवारी महाद्वार रोडवरील ओव्हरब्रिजखाली तपासणीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि त्यांच्या पथकाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या हर्षराज यळ्ळूरकर (२०), साई सेनावा (१९) आणि प्रेम कांबळे (२०) यांची झडती घेतली. त्यांच्याकडे बेकायदेशीररीत्या धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त करून तिघांविरुद्ध आर्म्स ॲक्ट व कर्नाटक पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, खडेबाजार परिसरातील रामराज कापड दुकानाजवळ छापा टाकून पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळवत असलेल्या एका महिलेला रंगेहात पकडले. तिच्याकडून जुगार साहित्य व रोकड जप्त करण्यात आली असून या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्तांनी कौतुक केले आहे.








