चिक्कोडी / वार्ताहर

चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बारावीची परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

भूमिका माळंगी ही बारावीची विद्यार्थिनी आजच्या परीक्षेसाठी तयारी करून घराबाहेर पडत होती. अंघोळ आटोपून बाहेर येत असतानाच तिला अचानक तीव्र झटका आला आणि ती जागीच कोसळली. भूमिका कोसळताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

परीक्षेच्या उंबरठ्यावर असलेल्या उमद्या विद्यार्थिनीचा असा अकस्मात अंत झाल्याने बंबलवाड गावात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.