बेळगाव / प्रतिनिधी

गणपतीबाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करत आणि वाजत-गाजत गणेशमूर्ती घरी नेण्याचा सोहळा बुधवारी साजरा होणार आहे. त्यासाठी गणेश भक्तांच्या उत्साहाचा झरा अखंडपणे वाहताना दिसून येत आहे. मागच्या वर्षी केलेल्या विनंतीला मान देऊन बाप्पांचे आगमन लवकरच झाले असल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. वर्षातून एकदा घरी येणाऱ्या श्री गणेश देवाच्या आगमनासाठी प्रत्येक घराघरांमध्ये सुसज्ज तयारी करण्यात आली आहे. घरोघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

काही गणेश भक्तांकडून मंगळवारीच श्री मूर्तीना घरी आणण्यात आले आहे. काही भक्तांनी उद्या होणाऱ्या गर्दीत मार्ग काढताना अडचण येते, याचा विचार करून परंपरेनुसार आज मंगळवारी श्री गणेश मूर्ती घरी नेण्यास प्रारंभ केला होता. मूर्ती, पूजा साहित्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी उसळली होती. बाप्पांच्या स्वागतासाठी आबालवृध्द उत्सुक झाले आहेत. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारीदेखील पूर्ण झाली आहे. दरम्यान, उत्सवकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

वाढती महागाई, रस्त्यांवर पडलेले खड्डे नित्याची वाहतूक कोंडी या साऱ्या चिंता आता विघ्नहर्त्यावर सोडून देत पुढचे काही दिवस बेळगावकर उत्सवाचा आनंद लुटणार आहेत. अनेक दिवसांच्या दमदार पावसामुळे काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेतही गर्दी वाढली आहे. बुधवारी घरोघरी आणि श्रींच्या मंडपातून बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह नागरिकही ढोल- ताशांच्या निनादात गणरायांचे स्वागत करणार आहेत. मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरीक मंगळवारी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

एरवी मंगळवार हा बाजारपेठेच्या सुट्टीचा दिवस असला तरी गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ ओसंडून वाहताना दिसून येत होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठ भागासह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ उपनगरांत गणेशमूर्ती सजावटीच्या साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. अनेकांनी सायंकाळी आपल्या खासगी वाहनातून, तर काहींनी रिक्षा, टेम्पो अशा वाहनांमधून गणरायाला आपल्या घरी नेले. रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक गणेश मंडळांनी मनमोहक कमानी उभारल्या आहेत.