• गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष
  • तब्बल ३० तासांहून अधिक वेळ मिरवणूक

बेळगाव / प्रतिनिधी

बाप्पा मोरयाचा गजर, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशा आणि बंदी असूनही डीजेचा गजर तसेच पुढच्या वर्षी लवकर या… अशी साद घालत जल्लोषी पण तितक्याच भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा श्रींची विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तासांहून अधिक वेळ चालली आणि अकरा दिवस आनंद, उत्साह ,चैतन्याने बहरलेल्या गणेशोत्सवाची बाप्पांना निरोप देत सांगता झाली.

प्रारंभी हुतात्मा चौक येथून विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त शुभा बी., आमदार आसिफ सेठ, माजी आमदार अनिल बेनके, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, गणेशपुर येथील रुद्रकेसरी मठाचे हरिगुरु महाराज, महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण – पाटील, ॲड. हनुमंत कोंगाली, विजय जाधव आदी उपस्थित होते. श्री गणेशाची आरती केल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला होता.

मिरवणूक मार्ग सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गणेशभक्तांच्या वर्दळीने गजबजला होता. रात्री नऊनंतर मिरवणूक मार्गावर गर्दी वाढली. पहिला गणपती संयुक्त महाराष्ट्र चौकाचा शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्तीचे कपिलेश्वर तलावात सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले. त्यानंतर विसर्जनस्थळी यंत्रणा सज्ज असूनही श्रीमूर्तीची प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या एकेक श्रीमूर्ती दाखल होऊ लागल्या.

मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि डीजेचीही साथ असल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. शनिवारी रात्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी झाली होती. शहराबाहेर विविध ठिकाणी बॅरिकेडस् लावून वाहनांना मिरवणूक मार्गाकडे येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे वाहने दूरवर थांबवून चालत येत श्रीमूर्ती पाहण्याचा आनंद घेतला जात होता. मिरवणूक मार्गावर शहरासह परगावच्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होती.

घरगुती गणेश विसर्जन : 

शनिवारी सकाळपासूनच नागरिकांनी घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी गर्दी केली. कपिलेश्वर तलाव, जक्कीन होंड तलाव, शहापूर तलाव, वडगाव तलाव, अनगोळ तलाव, नाथ पै तलाव, जुने बेळगाव येथील विसर्जन तलावात घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भाविकांनी कार, रिक्षा, टेम्पो बैलगाडी, सायकल ट्रॅक्टर दुचाकी यादी इतर खाजगी वाहनांतून श्रीमूर्ती विसर्जनासाठी आणल्या. या मार्गावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. तर काही ठिकाणी साऊंड सिस्टम लावून वाजत – गाजत मूर्ती आणण्यात येत होत्या. भाविकांनी गुलालाचीही उधळण केली.

हुतात्मा चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर काही मोजकीच गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाली. मारुती गल्लीमध्ये एकही गणेश मूर्ती दाखल न झाल्याने सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक मार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सुरुवातीला सहभागी झालेल्या मंडळाचे लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगावच्यावतीने श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते.

माळी गल्लीच्या मनाच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करून या मंडळांनी सर्वप्रथम श्रीमूर्ती विसर्जन करण्याचा मान मिळवला. त्यानंतर संथगतीने अन्य मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन सुरू झाले.

  • रात्री १० च्या दरम्यानच मिरवणुकीला प्रारंभ

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन प्रथम केले. आणि नंतर सार्वजनिक त्रिमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मंडपात दाखल झाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने रात्री १० च्या दरम्यानच मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलताशा पथकांचे सादरीकरण पाहण्यासाठी लोकांनी आवर्जून गर्दी केली होती. त्यामुळे या पथकांना प्रोत्साहन मिळाले. याशिवाय करेला,लाठीकाठी, लेझिमचे प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले. काही नागरिकांनीही सहभागी होऊन या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.

  • रात्री ११ नंतर मिरवणुकीत नागरिकांची गर्दी : 

घरगुती गणपतीचे विसर्जन केल्यानंतर नागरिक सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत होते. रात्री ११ नंतर मिरवणुकीत नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या साथीने यंदाची मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ढोलताशा पथकांच्या वादकांनी आपल्या वादनाने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक पाहण्यासाठी प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये गर्दी झाली होती तसेच रस्तेही गर्दीने फुलले होते.

  • शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स :

दरम्यान वाहनांची गर्दी रोखण्यासाठी आणि नागरिकांना सहजपणे श्रीमूर्तींची विसर्जन मिरवणूक पाहता यावी यासाठी पोलीस प्रशासनाने मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या आडव्या रस्त्यांची बॅरिकेड्स लावून अडवणूक केली होती. याची कल्पना नसल्याने वाहनदारांना मात्र लांबचा फेरा मारावा लागत होता. यामुळे नागरिकांना समस्या निर्माण झाल्या होत्या. पोलिसांकडून शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते.

  • पावसाने उघडीप दिल्याने उत्साहाला उधाण : 

अधून मधून होत असलेल्या पावसाने श्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान उघडीप दिल्याने उत्साहाला उधाण आले होते. पावसाचा व्यत्याने आल्याने मिरवणूक योग्यरित्या पार पडली. पावसाच्या उघडी पिंमुळे नागरिकही मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. लहान मुलांसह वृद्धांपर्यंत सर्वजण मिरवणुकीत सहभागी झाले होते.

  • मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून प्रसादाचे वाटप :

बेळगावची श्री विसर्जन मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी विविध राज्य व भागातून नागरिक सहभागी होत असतात. यामुळे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध ठिकाणी प्रसाद बनवून ते पाकीट बंद करून वाहनांच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.

  • ग्रहणामुळे श्रीमूर्ती विसर्जन दोन तासांसाठी थांबविले : 

दरम्यान, ग्रहण लागले म्हणून साडेदहापासून श्रीमूर्ती विसर्जन दोन तासांसाठी थांबविण्यात आले. ११.३० वाजून गेले तरी अद्याप चौदा श्रीमूर्तींचे विसर्जन करावयाचे शिल्लक होते.

  • विसर्जनाला उच्चांकी वेळ : 

यंदा विसर्जन मिरवणूक उच्चांकी वेळ म्हणजे तब्बल ३० तासांहून अधिक वेळ चालली. कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावावर नऊ क्रेनची सोय करण्यात आली होती. श्रीमूर्ती विसर्जनस्थळी आल्यानंतर आरती करून क्रेन लावण्यात वेळ जात होता. प्रशासन व महामंडळाने दक्षता घेऊनही विसर्जन प्रक्रिया संथगतीने सुरू राहिली. शनिवारी सायंकाळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी विसर्जन तलावाची पाहणी करून गर्दी व गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या. रात्री एक वाजता विसर्जन तलावावर गर्दी झाल्यानंतर बोरसे यांनी स्वत: तीन तास थांबून नियोजन केले.

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवले होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. जलद कृती दलाचे जवानही लक्ष वेधून घेत होते. गणेशभक्तांचा उत्साह आणि संथगतीने सुरू असलेले श्रींचे विसर्जन यामुळे सार्वजनिक श्रीमूर्तींना रांगेत थांबावे लागले. रविवारी सकाळी सातपर्यंत कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ तलावावर ११० श्रीमूर्तीचे विसर्जन झाले होते.

दोन्ही तलावावर नऊ क्रेन सेवेत होत्या. विसर्जन सुरू असताना दुर्घटना घडू नये, यासाठी लाईफ जॅकेट व जलतरणपटू तैनात होते. रविवारी रात्री आठ वाजता पंधरा गणेशमूर्ती विसर्जन होणे बाकी होते. यानंतर रात्री दहा वाजता महापालिकेच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर विसर्जनाची सांगता झाली. एकूणच यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला दरवर्षीपेक्षा अधिकच विलंब झाला.