• बनावट ओळखपत्रे, संगणकीय साहित्य जप्त

हुक्केरी / वार्ताहर

कुरणी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात हुक्केरीचे उपनिबंधक आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट दस्तऐवज आणि साहित्य जप्त करण्यात आले.

शिवानंद मारुती कुद्दुरी (रा. कुरणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांच्या आणि नातेवाईकांच्या नावावरील जमीन बळकावण्यासाठी बनावट करारपत्रे तयार करण्यात आली. गट क्रमांक १८९/४, १८३/३०ब आणि १८३/१३९ या जमिनींसंदर्भात खोटे फोटो व सह्यांचा वापर करून दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. या गैरप्रकारासाठी उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी नीलकंठ मुदपाकी यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ९ बनावट आधारकार्ड, ३ पॅनकार्ड आणि बनावट मतदार ओळखपत्रे मिळून एकूण १३ खोटी कागदपत्रे हस्तगत केली. तसेच अशोक सूर्यवंशी यांच्या फोटो स्टुडिओतून संगणक, लॅपटॉप, कॅमेरा आणि प्रिंटर यांसारखे साहित्य जप्त करण्यात आले, जे बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी हुक्केरीचे उपनिबंधक मडीवाळय्या बानीमठ आणि आनंद दड्डीमणी यांनी अटकपूर्व जामीन घेत पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे. नीलकंठ मुदपाकी, विजय मठद आणि अशोक सूर्यवंशी या तिघांना अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली असून पुढील तपास सुरू आहे.